Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्यासाठी 'हेड' तयार, हिंगोलीत लाडक्या भावांनीच लाटले पैसे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्यासाठी 'हेड' तयार, हिंगोलीत लाडक्या भावांनीच लाटले पैसे

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्यासाठी 'हेड' तयार, हिंगोलीत लाडक्या भावांनीच लाटले पैसे

Published Feb 07, 2025 07:50 PM IST

Ladki Bahin Yojana : अपात्र असतानाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते,या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर योजनेतून नाव मागे घेण्यासाठी तसेच आधी घेतलेले लाभ पैसे परत करण्यासाठी रांगा लागल्याचे दिसत आहे.

हिंगोलीत लाडक्या भावांनीच लाटले पैसे
हिंगोलीत लाडक्या भावांनीच लाटले पैसे

Ladki Bahin Yojana: राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र यातील लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. अशा अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत असून केवळ पुण्यातून जवळपास ७५ हजार महिलानी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पैसे परत घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हेड तयार करण्यात आला आहे.

ज्यांच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे, अशा अपात्र अनेक महिलांनी पैसे परत करायला सुरुवात केली आहे. अपात्र असतानाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते,या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर योजनेतून नाव मागे घेण्यासाठी तसेच आधी घेतलेले लाभ पैसे परत करण्यासाठी रांगा लागल्याचे दिसत आहे.

अपात्र महिलांकडून पैसे वसूल करण्यासाठी आतापर्यंत हेड नव्हता त्यामुळे पैसे घेता येत नव्हते. मात्र आता ज्या अपात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी हेड तयार करण्यात आला आहे. यामुळे अपात्र महिलांचा आकडा वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

पैसे परत घेणं कायद्यात बसतं का?

काही दिवसापूर्वी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील निकषा संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, 'स्वत:हून पैसे परत देणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जातील, पण पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. याबाबत कोणतीही चर्चा आणि निर्णयही सरकारचा झालेला नाही.या योजनेत आतापर्यंत एकूण २ कोटी ३४ लाख महिला लाभार्थी आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केला होता. यातील २ कोटी ३४ लाख महिलांना पात्र ठरवले होते. सुरुवातीला १६ ते १७ लाख महिलांना अपात्र ठरवले होते. आता लाभ मिळालेल्या ५ लाख महिला नव्याने अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे आधी पात्र ठरलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी न करताच त्यांना लाभ दिल्याचे आता समोर आले आहे. त्यांच्याकडून पैसे परत न घेणे म्हणजे याचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच सरकारने आधी पात्र ठरवून पुन्हा अपात्र ठरवल्यास त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाऊ शकते का, यावरूनही अनेक मतप्रवाह आहेत.

अपात्रतेचे निकष काय?

  • अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे.
  • वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे.
  • कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या,
  • नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या
  • स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.

हिंगोलीतलाडक्या भावांनीच उचलले योजनेचे पैसे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ काही ठिकाणी पुरुषांना झाल्याचा प्रकार याआधीही समोर आले होते. आता पुन्हा नव्याने हिंगोलीत चार लाडक्या भावांनी बहिणींच्या नावार पैसे उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. या चौघांनी प्रत्येकी९हजार रुपये उचलले आहेत. लाडकी बहीण योजनेंतर्गत केवळ महिलांना लाभ दिला जात असताना औंढा नागनाथ तालुक्यातील चौघांनी आधार कार्डवर महिलांचे फोटो लावून बनावट आधारकार्ड तयार करून या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

 

ज्या कुणाला योजनेचा लाभ घ्यायचा नसेल त्यांनी तसा अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातून आठ अर्ज प्राप्त झाले असून चार महिला आणि चार पुरुषांचे अर्ज हे अर्ज आहेत. या योजनेतंर्गत लाटलेले प्रत्येकी ९ हजार रुपये त्या चौघांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या