Ladki Bahin yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वाची माहिती पुढे आली आहे. या योजनेचा पहिला हप्ता खात्यात कधी जमा होणार या बाबत सर्वांना उत्सुकता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हप्ता खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली आहे. फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा १७ ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आंनदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून या योजनेचा पहिला हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दीड कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या आधी महिलांच्या खात्यात पाठवणार असल्याची माहिती स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सरकार १७ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत, विवाहित, घटस्फोटित आणि २१ ते ६० वयोगटातील निराधार महिलांना प्रति महिना १५०० रुपये खात्यात दिले जाणार आहे. लाभार्थींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांच्या आत असावे अशी या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अट आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री युवा कार्यशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील १० लाख बेरोजगार तरुणांना सहा महिन्यांसाठी रोजगार प्रशिक्षण देण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे.
फडणवीस म्हणाले की, सरकारने गेल्या दीड वर्षात १२ हजार मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती केली आहे. सौरऊर्जेमुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याने शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी, जूनमध्ये सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात, महाराष्ट्र सरकारने महिला, बेरोजगार युवक, शेतकरी आणि कुटुंबांसाठी अनेक लोकप्रिय उपायांची घोषणा करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक देखील झाली होती. त्यानुसार लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता खात्यात जमा करून दिला जाणार आहे. १९ तारखेला रक्षाबंधन असून १७ तारखेला या योजनेचा पहिला हप्ता हा महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी दोन महिन्यांचे ३००० रुपये जमा होणार आहेत.