ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एन्ट्री असलेला ‘लापता लेडिज’ या चित्रपटाचं टायटल आता महाराष्ट्राच्या राजकीय मैदानातही धुमाकूळ घालणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत कॉंग्रेस पक्षाकडून राज्यातून बेपत्ता होणाऱ्या महिलांचा मुद्दा तापवला जाणार आहे. राज्यातून दरवर्षी गायब होणाऱ्या ६४ हजार महिलांचं काय, असा सवाल विचारणारे पोस्टर कॉंग्रेस पक्षाकडून छापण्यात आले असून पोस्टरच्या माध्यमातून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे.
‘लापता लेडिज’ सिनेमाच्या पोस्टरप्रमाणेच हे पोस्टर असून हिरव्या बॅकग्राउंडवर छापलेल्या या पोस्टरवर ‘लापता लेडिज’ असं ठळकपणे लिहिलं आहे. पोस्टरवर दोन अस्पष्ट चेहरे असलेल्या महिलांचे फोटो छापण्यात आले आहे. तसेच या पोस्टरवर खाली तळाशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे दिसणाऱ्या प्रतिकृती आहेत. पोस्टरवर या तीनही मंत्र्यांचे चेहरे अस्पष्ट दाखवण्यात आले असून त्यात फक्त ओठ आणि नाक दाखवण्यात आले आहे. मात्र चित्रांवरून हे तिघेही मंत्री कोण आहेत, याचा अंदाज सहज बांधता येतो. कॉंग्रेस पक्षाकडून लाखोच्या संख्येेने हे पोस्टर छापण्यात आले असून राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये झळकवण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचं या पोस्टरच्या माध्यमातून विरोधकांकडून राज्यातील नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं राजकीय समिक्षकांचं म्हणण आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली असून यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. राज्यात बदलापूर येथे बालिकांच्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनवर नागरिकांचा उद्रेक निर्माण झाला होता. त्यानंतर अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर करण्यात आले होते. त्यावर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी सुरू आहेत. एकीकडे सरकार राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवून दर महिन्याला दीड हजार रुपये वाटते, तर दुसरीकडे दरवर्षी ६४ हजार महिला बेपत्ता होतात, याची भीषणता जनतेसमोर आणण्यासाठी ही मोहिम राबवण्यात आली आहे. महिला असुरक्षिततेच्या मुद्दावर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.