Kudal News : नवीन वर्षांचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. या साठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आलं होतं. स्वागत करतांना कोणतीही कसर राहणार नाही याची पुरेपूर सर्वांनी काळजी घेतली. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात गेले होते. दरम्यान, सिंधुदुर्गच्या कुडाळ येथे काही पर्यटक व स्थानिक नागरिकांत जोरदार बाचाबाची झाली. मुंबईच्या पर्यटकांनी स्थानिक नागरिकांना मारहाण केल्याने चांगलाच राडा झाला. हे प्रकरण पोलिसांत गेलं. कुडाळ पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे कोकणात गेले होते. यावेळी सिंधुदुर्गमधील कुडाळ बाजारपेठेत देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या बाजारपेठेतून जात असतांना इनोवा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिली. यावरून मोठा वाद झाला. मुंबईच्या महिला पर्यटकांनी कुडाळमधील व्यावसायिक आप्पा गडेकर याला बेदम मारहाण करत धिंगाणा घातला. दरम्यान, राजकीय पदाचा वापर करुन पोलिसांवर दबाव टाकत असल्याच्या आरोप देखील ग्रामस्थांनी केला. यामुळे कविलकाटे गावातील नागरिक थेट कुडाळ पोलीस स्टेशन बाहेर जमले. त्यांनी आरोपी पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. मात्र, पोलिस हे प्रकरण मिटवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला व त्यांना स्थानिकांना सुपूर्द करण्याची मागणी केली. यामुळे मोठा राडा पोलिस ठाण्यासमोर झाला होता.
डोंबिवलीत देखील उसाटने गावामध्येही एक राडा झाला. एका तरुणाला कारमधून बाहेर काढून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. आदित्य मढवी असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या कारची तोडफोड देखील करण्यात आली. ८ ते १० जणांनी त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. तर त्याच्या कुटुंबियाला तुमच्या मुलीला उचलून नेणार अशी धमकी देखील आरोपीनी दिली. एका प्रकरणात मध्यस्थी करण्यात आल्याने हा हल्ला आदित्यवर करण्यात आल्याची माहिती आहे. यात आदित्य हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.