Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. आज जवळपास ७ ते ८ लाख नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याने जवळपास १० ते १२ हजार पोलिसांच्या बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे नगर मार्गावरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. येथे येणाऱ्यांसाठी प्रशासनातर्फे ‘विजयस्तंभ सुविधा’ हे अॅप विकसित करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ३१ डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात नागरिक कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा या ठिकाणी जमले आहे. आज सकाळपासून या ठिकाणी भीम अनुयायी येत असून विजयस्थंभा जवळ मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी देश व राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात. गेल्या काही वर्षांपासून येथे येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षी १० लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या नुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांची गैर सोय होऊ नये व त्यांना व्यवस्थित अभिवादन करण्यात यावे यासाठी या ठिकाणी मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सोबतच आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, ज्येष्ठांसाठी निवारा कक्ष, शौचालय सुविधा, पिण्याचे पाणी, पोलीस मदत कक्ष, वाहनतळ आदी सुविधा या परिसरात उभारण्यात आल्या आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकारी व १७ समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, मंगळवारी (३१ डिसेंबर) रात्री पेरणे फाटा येथपासून विजयस्तंभ परिसरात अनुयायांनी येण्यास सुरुवात झाली आहे. पेरणे फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायांनी हातात झेंडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन कोरेगाव भीमाच्या दिशेने जात असून हा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज विजयस्थंभ येथे येत अभिवादन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं. यावेळी, अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी आलो असून भीमा कोरेगावचा जो संघर्ष आहे तो शारीरिकरित्या संपला असला तरी मानसिकरित्या अजूनही सुरु आहे. देशात जोपर्यंत हा मानसिक संघर्ष सुरू आहे तोपर्यंत मानवतेच्या दृष्टीकोणातून जे-जे स्तंभ आहेत, त्या विजयस्तंभाला लोक अभिवादन करण्यासाठी येत राहतील, असे आंबेडकर म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळा उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहतूक, अनुयायांसाठी मोफत बससेवा, पिण्याचे पाणी, शौचालय, स्वतंत्र दर्शन रांग, वाहनतळ व इतर सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या