मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 11, 2024 05:35 PM IST

Konkankanya Express News : कोकणकन्या एक्सप्रेसमधून लटकत प्रवास करत असताना दरवाजातून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. दादरच्या फलाट क्रमांक ११ वर गुरुवारी रात्री ११.१५ वाजता ही घटना घडली.

‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू (इनसेटमध्ये मृत तरुण)
‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू (इनसेटमध्ये मृत तरुण)

उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी होत आहे. सर्वच लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना गर्दी वाढत आहे. रस्तेमार्गाने कोकणातजाणे वेळखाऊ व खर्चिक व वेळखाऊ असल्याने प्रवाशी रेल्वेला प्राधान्य देतात. यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल होत आहेत. त्यातच आता दरवाजाला लटकून प्रवास करणे प्रवाशांच्या जीवावर बेतलं आहे. कोकणकन्या एक्सप्रेसमधील गर्दीतून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमित पवार असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोकणकन्या एक्सप्रेसमधून लटकत प्रवास करत असताना दरवाजातून पडून त्यांचा मृत्यू झाला. अमित पवार मूळचे सिंधुदुर्ग येथील असून मुंबईतील कांदिवली चोरकोप भागात वास्तव्यास होते. कोकणकन्येच्या जनरल डब्यातून दरवाज्यात लटकून प्रवास करताना त्यांचा अपघात झाला. ही घटना गुरुवारी घडली आहे.

अमित पवार कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करत होते. उन्हाळी सुट्ट्यांमुळे आरक्षण फुल्ल झाल्याने त्यांनी जनरल डब्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. जनरल डब्यातही प्रचंड गर्दी असल्याने त्यांना आतामध्ये शिरता आले नाही. त्याही परिस्थितीत त्यांनी दरवाजावरील पायदानावर लटकत प्रवास सुरू केला. मात्र दादर स्थानकातील फलाट क्रमांक ११ वरून गाडीने वेग घेताच त्यांचा तोल गेला वते फ्लॅटफॉर्मच्या टोकावर पटून गाडीच्या चाकाखाली आले. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना झाली. या प्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,अशी माहिती दादर रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी केले आहे.

मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू -

मुंबईत लोकल ट्रेनमधून पडून प्रवाशांच्या मृत्यूचं सत्र सुरुच आहे. शुक्रवारी सायंकाळी एका प्रवाशाचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधून मुंब्रा ते कळवा दरम्यान पडून तरुणाचा मृत्यू झाला. मुंब्रा व कळवा दरम्यान पारसिक बोगद्याजवळ हा अपघात झाला.

शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मागील दोन महिन्यातील या मार्गावरील ही पाचवी घटना घडली आहे.

 

IPL_Entry_Point