कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये मध्यरात्री तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे एक्स्प्रेस जवळपास पाच तास एकाच जागी होती. अखेर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली आहे. मात्र कोकण रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनमधील बिघाडामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या खोळंबल्या होत्या. यामुळे विस्कळीत झालेल्या रेल्वेच्या वेळापत्रकाचा सर्वसामान्यांसह कोकण दौऱ्यावर निघालेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही फटका बसला.
कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर पाच तास वाहतूक विस्कळीत होती. वीर स्टेशनवर कोकणकन्या एक्सप्रेस यामुळे थांबली होती. इंजिनमधील बिघाड दूर करण्यात पाच तासांनी रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली तरी कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान कोकणकन्या एक्सप्रेस बंद पडली. यामुळे अनेक गाड्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबवण्यात आल्या. सध्या कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्या तब्बल दोन तास ते साडे तीन तास उशिराने धावत आहेत. यामध्ये कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्सप्रेस, मडगाव एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.