कोकणातील निसर्ग सौंदर्य ,पर्यटन स्थळे, उद्योग, लोककला, संस्कृती यांचा प्रचार आणि प्रसारासाठी दरवर्षी ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात येतो. मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि लंडन येथे आजपर्यंत नऊ ग्लोबल कोकण महोत्सव झाले. यंदा ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीत ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. २५ ते ३० जानेवारी दरम्यान संत सावळाराम म्हात्रे महाराज क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे महोत्सव आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये तीन ते चार लाख कोकण प्रेमी सहभागी होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
यावर्षी ग्लोबल कोकण महोत्सवाचे १० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ‘भव्य, समृद्ध कोकण’ सप्ताह आयोजित करत आहोत. या महोत्सवात कोकणात आधुनिक आणि शाश्वत शेती, इको टुरिझम ,पर्यावरण पूरक पर्यटन, खाऱ्या पाण्यातील माशांची शेती, मसाला शेती, बांबू लागवड ,जल व्यवस्थापन, ग्रामीण उद्योग निर्मिती करता सरकारी योजना अशा विविध विषयांमध्ये मार्गदर्शन परिषदा यावेळी आयोजित करण्यात आल्या आहे. याच बरोबर कोकणची सांस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास, शिल्पकला आणि बरच काही बघायला मिळणार आहे.
संपूर्ण कोकणातून जवळपास ३०० स्टॉल आणि १००० हून अधिक उद्योजक या प्रदर्शनात सहभागी होतील. हाऊस बोट, व्हाईट वॉटर राफ्टींग, निसर्ग पर्यटन, खाऱ्या व गोड्या पाण्यातील माशाची शेती, बांबू लागवड, मसाला शेती, असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कोकणातील तरुण गावागावात राबवत आहेत या उद्योगांचा प्रचार आणि प्रसिद्धी प्रामुख्याने या महोत्सवात करण्यात येईल. कोकणात ग्रामीण भागात उद्योग उभे राहावे याकरिता उद्योग विभाग, मत्स्य विभाग ,ग्रामविकास विभाग ,पर्यटन विभाग, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि अन्य शासकीय विभागांच्या अनेक योजना कोकणात राबवण्यात येतात या योजनेची माहिती या प्रदर्शनात मिळू शकेल. कोकणातील प्रमुख वीस सामाजिक संस्था यावर्षी भारतरत्न विनोबा भावे या दालनामध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी मूर्तिकला, शिल्पकला, काष्ठ शिल्प कोकणातील कलाकृतींसाठी भव्य कलादालन उभारण्यात येणार आहे. कोकण विकासासाठी योगदान असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात येईल.