Kolkata rape murder case : कोलकात्यात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशभरात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. आयएमएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवार, १७ ऑगस्टपासून २५ तासांसाठी हा बंद (Doctor strike) असणार आहे.
या भीषण घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला होता, परंतु १४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा झालेल्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान घटनास्थळावरील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये अज्ञातांच्या जमावाने तोडफोड केल्यानंतर डॉक्टरांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आयएमएने (Indian Medical Association) आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देशातील सर्व आधुनिक वैद्यक डॉक्टरांनी कोणतेही क्षेत्र आणि कामाचे ठिकाण विचारात न घेता २४ तास सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील सेवा आणि शस्त्रक्रिया सुरू राहतील. सर्व खासगी रुग्णालयातील ओपीडी बंद राहणार आहेत. तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संप सुरू राहील.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा लागू करावा, अशी मागणी संघटनेने आपल्या मागण्यांच्या यादीमध्ये केली आहे. मेडिकल असोसिएशनने पुढे म्हटले आहे की, रुग्णालयांमधील सुरक्षा विमानतळाहून कमी नसावी.
रुग्णालयांना सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करणे आणि सक्तीचे सुरक्षा हक्क देणे ही पहिली पायरी आहे. सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांची नेमणूक आणि प्रोटोकॉलचे पालन करता येईल.
या भीषण गुन्ह्याची वेळीच आणि पारदर्शक चौकशी व्हावी, तसेच पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांना आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर मोठी नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
९ ऑगस्ट रोजी आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ३१ वर्षीय पदव्युत्तर डॉक्टर मृतावस्थेत आढळली होती. शवविच्छेदनात लैंगिक अत्याचाराची चिन्हे दिसून आली होती. या महिलेला अनेक जखमा झाल्या होत्या, तिच्या डोळ्यातून आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता आणि तिचे पेल्विक गिल्डल तुटले होते.
यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्वरीत न्याय आणि सुधारित कायद्यांच्या मागणीसाठी देशभरातील डॉक्टर समुदाय संपावर गेला आहे.