मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  साताऱ्याजवळ भीषण अपघात, कोल्हापूरच्या एका वारकऱ्याचा मृत्यू; 30 जण जखमी

साताऱ्याजवळ भीषण अपघात, कोल्हापूरच्या एका वारकऱ्याचा मृत्यू; 30 जण जखमी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 19, 2022 12:24 PM IST

कोल्हापूरहून आळंदी-पंढरपूर दिंडीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला.

अपघातग्रस्त ट्रक
अपघातग्रस्त ट्रक

सातारा पुणे महामार्गावर (Satara-Pune Road ) शिरवळ हद्दीत असलेल्या पुणे स्टॉपवर भीषण अपघात झाला. यामध्ये आयशर टेम्पोने दींडी सोहळ्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली आहे. यामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. हे वारकरी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील भादोले इथून आळंदी-पढरपूर पायी दिंडीसाठी निघाले होते.

याबबात मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातून आळंदी ते पंढरपूर वारीसाठी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वारकरी निघाले होते. दोन ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरमध्ये महिलांसह ४३ वारकरी होते. सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर शिरवळ गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यानं तो महामार्गावर मध्यभागी असलेल्या विजेच्या खांबावर आदळला. त्यानंतर दिंडी सोहळ्याला निघालेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. यामुळे ट्रॅक्टरमधील वारकरी महामार्गावर उडून पडले.

आयशर टेम्पोने दिलेली धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात मायप्पा कोंडिबा माने (वय ४५, भादोले) यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. तर मारुती भैरवणात कोळी यांची प्रकृती गंभीर आहे.

अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी आणि शिरवळ पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. एकूण ४३ जणांपैकी ३० जण गंभीर जखमी आहेत तर ११ जण किरकोळ जखमी असल्याची माहिती समजते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ४ तास खोळंबली होती.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या