vishalgad encroachment dispute: किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या आठवड्यापासून आंदोलन सुरू केले आहे. मागील रविवारी महाआरती करण्यात आली होती. या आठवड्यात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रशासन याबाबत निष्क्रिय असल्याचा आरोप करून शिवप्रेमींना आज विशाळगडावर येण्याचे आवाहन केले होते. मात्र आज अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला हिंसक वळण लागले. प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक,जाळपोळ केल्याने पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
जाळपोळीत अनेक घरेववाहने जळून खाक झाली आहेत. यात अनेक जण जखमी झाले आहेत.विशाळगडा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली जात आहे. मात्र या मोहिमेला हिंसक वळण लागले. गडावर सोडण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर कार्यकर्ते हिंसक झाले व त्यांनी किल्ल्याला लागून असलेल्या गजापुरात काही घरे पेटवून दिली. दारात लावलेल्या गाड्यांवर दगडफेक करून चारचाकी गाड्या उलथून टाकल्या.
रविवारी सकाळी विशाळगडावरील रहमान मलिक दर्ग्याजवळ जय श्रीरामच्या घोषणा देत दगडफेकीचा प्रकार घडला. यामध्ये स्थानिकांसह एक पोलीस जखमी झाला. यावर प्रतिहल्ला झाल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला. याचे पडसाद गडाच्या पायथ्याला उमटले. या ठिकाणी जमलेले हजारो लोक आक्रमक झाले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे गडाच्या पायथ्याशी आगमन झाल्यावर जय भवानी जय शिवाजी,विशाळगड अतिक्रमण मुक्त करा अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी संभाजीराजे यांना गडावर जाण्यास प्रतिबंध केल्यानंतर जमावाने भर पावसात एका घरात सिलेंडरचा स्फोट केला. कित्येक घरे पेटवून देण्यात आली. शेकडो दुचाकी,मोटारी यांची नासधूस करण्यात आली. आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
दगडफेकीत १० चारचाकी गाड्यांसह, १० ते १५ दुचाकी वाहनांचे तर १५ ते २० घरांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरातील फर्निचर, प्रापंचिक साहित्य रस्त्यावर आणून फेकले व त्याची मोडतोड करण्यात आली. या घटनेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक अप्पासाहेब पोवार, जुना राजवाड्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह नऊ कर्मचारी जखमी झाले आहेत.
या हिंसाचारात काही ठिकाणी तलवारी, कोयते, कुदळ यांचाही वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकाराने विशाळगडासह गजापुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेनंतर या परिसरातील पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला. दरम्यान,याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
घटनास्थळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासह बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संबंधित बातम्या