Kolhapur ST Bus news : एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बसचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. भर रस्त्यात जात असतांना एसटीचा पत्रा हवेत उडत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तरी सुद्धा मंडळात अनेक खराब गाड्या असून ही बस प्रवाशांच्या जिवावर उठत आहेत. अशीच एक घटना कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात उघडकीस आली आहे. असुर्ले पोर्ले येथील विद्यालयात बसमधून जात असतांना एका विद्यार्थिनीच्या पायाखालचा पत्रा अचानक सरकल्याने ती थेट बसच्या इंजिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता घडली. या मुलीचा जीव थोडक्यात वाचला असला तरी या नादुरुस्त बसमुळे महामंडळाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
शुभश्री लहू पाटील असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. ती पन्हाळ्यातील आसुर्ले पोर्ले येथील आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूलमध्ये शिक्षण घेते. ही विद्यार्थिनी मंगळवारी महामंडळाच्या बस क्रमांक एमएच ०७ सी ७९९० या बसमध्ये शाळेत जाण्यासाठी बसली. ही एसटी दालमिया शुगर कारखान्यासमोर आली असता या ठिकाणी थांबा घेतल्यावर अचानक या विद्यार्थीनीच्या पायाखालील एसटीचा पत्रा सरकला आणि ती थेट एसटीच्या इंजिनमध्ये अडकली. यात शुभश्री लहू पाटीलच्या पायाला गंभीर मार लागला. या घटनेची माहिती मिळाल्यावर शाळेतील शिक्षक, जीवन खवरे, विकास खोत, शिक्षिका दिपाली मोरे यांनी तिला तातडीने जखमी मुलीला पन्हाळा रुग्णालयात नेले. तिच्यावर पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
ही बस चालक जयसिंग भीमराव पाटील चालवत होते. तर संदीप विष्णू गायकवाड हे वाहक म्हणून काम पाहत होते. अस्लम इस्माईल शेख हे वाहतूक नियंत्रक म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या पालकांनी थेट पोलिसात धाव घेतली असून पन्हाळा पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या पूर्वी देखील एका धावत्या बसचा पत्रा हा बाहेर असतांना सुद्धा एका एसटी चालकाने ही बस भरधावर वेगात रस्त्यावर चालवली होती. हा पत्रा लागून सकाळी व्यायाम करणाऱ्या काही तरुणांचा हात कापला गेला होता. तर काही जण गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी पाठलाग करून या चालकाला पकडले होते.
महामंडळाच्या अनेक बस नादुरुस्त असतांना त्या का चालवल्या जातात असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे. यामुळे कुणी ठार झाले तर जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या