Sangeetsurya Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. गुरुवारी रात्री ०९.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत आगीमध्ये नाट्यगृहाचे बहुतेक साहित्य जळून भस्मसात झाले आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा उघड्या डोळ्यात देखत बेचिराख झाल्याचे दुःख नाट्यप्रेमींना आहे. अग्निशामक दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे.
सुरुवातीला खासमैदानावरील लाकडी स्टेजला लागली. त्यानंतर आग केशवराव भोसले नाट्यगृहात शिरली. नुकतेच नाट्यगृहाचे अलीकडे नूतनीकरण झाले आहे. नाट्यगृहामध्ये लाकडी बांधकाम मोठे आहे. यामुळे आग झपाट्याने पसरली. नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे नागरिकांतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. महापालिका यंत्रणा, अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
या आगीची माहिती मिळताच काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, महापालिकेच्या आयुक्त के. मंजू लक्ष्मी, वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान आणि नाट्यगृहाची उभारणी केली होती. शाहू महाराज यांच्या कालावधीत पॅलेस थिएटर असे म्हटले जात असे.
केशवराव भोसले नाट्यगृह हे महाराष्ट्रातील सर्वात जुने नाट्यगृहांपैकी एक आहे, ज्याचे बांधकाम सुमारे ९० वर्षांपूर्वीचे आहे. नाट्यगृहाचे रंगमंच भव्य चौकोनासारखे असून ते ७२० फूट आकाराचे आहे. रंगमंचाखाली १० फूट खड्डा असून त्यात पाणी आहे. पूर्वी ही विहीर होती असे म्हणतात. रंगमंचाखाली पाणी ठेवण्याचा उद्देश आवाज घुमावा हा आहे. हे या नाट्यगृहाचे एक खास वैशिष्ट्य आहे. रंगमंचाच्या पूर्वेकडील बाजूस दोन रंगपटगृहे आहेत.