सतेज पाटलांच्या नाराजीनंतर शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? छत्रपतींनी निवेदन प्रसिद्ध करत केला खुलासा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सतेज पाटलांच्या नाराजीनंतर शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? छत्रपतींनी निवेदन प्रसिद्ध करत केला खुलासा

सतेज पाटलांच्या नाराजीनंतर शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? छत्रपतींनी निवेदन प्रसिद्ध करत केला खुलासा

Nov 05, 2024 07:53 PM IST

Kolhapur Politics : सतेज पाटलांनी शाहू महाराजांचा अपमान केला व शाहू महाराजकाँग्रेसच्याखासदारकीचा राजीनामा देणार असे बोलले जातआहे. यावर शाहू महाराजांनी निवेदन जारीकरत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार?
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार?

विधानसभा निवडणूक २०२४ साठी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात नाट्यमय घडामोडी घडत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमा राजे यांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने काँग्रेस निवडणुकीआधीच चितपट झाली आहे. शाहू महाराज मधुरिमाराजेंना सही कर असे सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर सतेज पाटील मला तोंडघशी का पाडलात, दम नव्हता तर लढायचे नव्हते, मी माझी ताकद दाखवली असते. मला कशाला तोंडघशी पाडले, हे बरोबर नाही महाराज, असे म्हणताना दिसत होते. यावरून सतेज पाटलांनी शाहू महाराजांचा अपमान केला व शाहू महाराज काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देणार असे बोलले जात आहे. यावर शाहू महाराजांनी निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

नाईलाजाने आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे तसेच काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आल्याचे शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले. तसेच एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती, असेही शाहू महाराज म्हणाले.

विधानसभा निवडणुकीतील माघारीनंतर शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत शाहू महाराज म्हणाले की, त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करीत आहे आणि काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार आहे, असेही शाहू महाराजांनी स्पष्ट केले. 

सतेज पाटलांनी अपमान केला का?
सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उ‌द्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीतून परत आलो. असे शाहू महाराज यांनी स्पष्ट केले.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर