कोल्हापुरात काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक गटातील वाद पुन्हा उफाळला आहे. राजाराम कारखान्याच्या एमडीला कपडे फाटेपर्यंत रस्त्यातच मारहाण केल्याची घटना घडली आहे. सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार कसबा बावडा येथे मंगळवारी रात्री घडली. यामुळे पाटील-महाडिक गटातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
राजाराम कारखान्याकडून ऊस उत्पादक सदस्यांचा ऊस वेळेत नेत नसल्याचा आरोप करत सतेज पाटील गटाकडून साखर सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी सकाळी मोर्चा काढला होता. यामध्ये सतेज पाटीलही सामील झाले होते. साखर कारखान्याने सभासदांचा ऊस येत्या आठ दिवासांत न नेल्यास राजाराम कारखान्यावर धडक देण्याचा इशारा सतेज पाटील यांनी दिला होता. सकाळी मोर्चा काढल्यानंतर सायंकाळच्या सुमारास कसबा बावडा परिसरात सतेज पाटील समर्थकांनी कारखान्याच्या एमडीला बेदम चोप दिला. यात त्यांची कपडेही फाटले.
कारखान्याकडून ऊस नेण्यावरून राजकारण सुरु असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला होता. कारखान्यावर महाडिक गटाची सत्ता आहे. सतेज पाटील यांनी कारखान्याच्या कारभारावरही टीका केली. आता राजाराम कारखान्यावरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण पेटलं आहे.