Kolhapur news : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस सज्ज आहेत. अशातच कोल्हापूर येथे गस्तीवर असतांना एका फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी काही तरुणींना नाचवून दारू पिऊन काही जण धिंगाणा घालत असल्याचं पोलिसांना आढळलं. या प्रकरणी ९ डान्सर तरुणींसह ३१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात व जिल्ह्यात ठीक ठिकाणी पोलिस गस्त घालत आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची देखील चोख तपासणी केली जात आहे. आशातच गगनबावडा परिसरातील कोदे येथे एका फार्म हाऊसवर बेकायदेशीर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार यांच्या पथकाने या ठिकाणी जात छापेमारी केली. या ठिकाणी काही जण अश्लील हावभाव करून दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या ठिकाणावरून ९ डान्सर तरुणींसह ३१ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात मुंबई, नवी मुंबई, पुणे सांगलीसह कोल्हापुरातील काही जणांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गगनबावड्यातील कोदे परिसरात आंबेवाडी येथील नयनिल फार्म रिसॉर्टवर ही कारवाई केली, या कारवाईत ४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. यात दारू, मोबाईल व इतर काही गोष्टींचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ३१ जणांविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.