Kolhapur North Constituency Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते सतेज पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडे या मतदारसंघात उमेदवारच राहिला नाही. त्यामुळं मात्र सतेज पाटील हे चांगलेच भडकले आहेत. 'दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, मी पण दाखवली असती माझी ताकद' असं म्हणत सतेज पाटलांनी त्यांचा राग व्यक्त केला. सतेज पाटील यांनी खासदार शाहू छत्रपती यांच्यावर आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती सोमवारी अर्ज माघारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. यावेळी सतेज पाटील हे चांगलेच संतापलेले दिसले.यावेळी सतेज पाटील म्हणाले,आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती? हे काय बरोबर नाही महाराज. तुम्ही जेवढ्यांनी आग लावली आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा.’ असा स्पष्ट इशारा सतेज पाटलांनी दिला आहे.
सतेज पाटील म्हणाले की, माझी फसवणूक केल्यासारखं आहे हे. मग आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. आम्हाला काय अडचण नव्हती हे चुकीचे आहे महाराज, हे बरोबर नाही. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती, असे म्हणत खासदार शाहू छत्रपती यांच्यावर सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जेवढ्यांनी ही आग लागली तेवढ्या सगळ्यांना सांगतो, लक्षात ठेवा. दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, मी पण दाखवली असती माझी ताकद असा संताप व्यक्त करत सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.
काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतर राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष अर्ज भरला होता. लाटकर उमेदवारी मागे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरिमाराजे यांनीच अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीमुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने मविआचा येथे उमेदवारच शिल्लक राहिला नाही. त्यांना येथे अपक्षाला पाठिंबा द्यावा लागणार आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज (दि.४) शेवटचा दिवस होता. दरम्यान, राजेश लाटकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
कोल्हापूर काँग्रेसमधून सुरूवातीला राजू लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर लाटकर यांच्या उमेदवारीला काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. यानंतर काँग्रेसने पुन्हा मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, कोल्हापूर उत्तरची निवडणूक महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि महाविकास अघाडीच्या मधुरिमाराजे छत्रपती अशी लढत अधिक अतितटीची आणि प्रतिष्ठेचे बनली होती. मात्र आज मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.