Vishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमणाचा वाद पेटला, हिंसाचाराविरोधात एमआयएमकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमणाचा वाद पेटला, हिंसाचाराविरोधात एमआयएमकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा

Vishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमणाचा वाद पेटला, हिंसाचाराविरोधात एमआयएमकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा

Jul 16, 2024 08:26 PM IST

Vishalgad encroachment : मआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

विशाळगड हिंसाचाराविरोधात एमआयएमकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा
विशाळगड हिंसाचाराविरोधात एमआयएमकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. यात अनेक घराचे व गाड्यांची नासधूस करण्यात आली आहे. दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात स्थानिकांचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणात संभाजीराजे छत्रपतींसह जवळपास १०० हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाळगडावरील नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार शाहू महाराज आज विशाळगडावर गेले होते. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाध साधला. विशाळगडावरील महिलांनी शाहू महाराजांसमोर आक्रोश करत कैफियत मांडली. नुकसान पाहून शाहू महाराजांचे डोळे पाणावले. तर दुसरीकडे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं की,विशाळगड तोडफोडीप्रकरणी येत्या२०जुलै रोजी पक्षाकडून राज्यभर निषेध आंदोलन केले जाणार आहे. सर्व विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले जातील. ज्या पद्धतीने विशाळगडावरील प्रार्थनास्थळाची तोडफोड करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. हातात तलवारी, चाकू घेऊन मुस्लिमांच्या घरात घुसून दहशत माजवली गेली. महिलांना धमकावले गेले. हिंसाचार घडत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. याचा आम्ही राज्यभर निषेध करणार आहोत.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवणार असल्याचे म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला. ते अतिक्रमण निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखत आहे. आता महाविकास आघाडीच्या लोकांनी स्पष्ट करायला हवं की ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या बाजूने आहेत.

 

विशाळगडावर जाण्यास माध्यमांना अटकाव -

आज खासदार शाहू महाराज व काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विशाळगडावर जावून नुकसानीची पाहणी केली. मात्र विशाळगडाकडे जात असताना पोलिसांनी खासदार शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना पांढरे पाणी परिसरात अडवले होते. विशाळगडावर संचारबंदी असल्याने त्यांना सोडता येणार नसल्याचे सांगितले. मात्र सतेज पाटील आणि महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर १५ जणांना गडावर जाण्याची परवानगी दिली. दरम्यान माध्यमांना प्रशासनाने अटकाव केला आहे. त्यांना जोपर्यत सोडले जात नाही तोपर्यंत विशाळगडावर जाणार नसल्याची भूमिका शाहू महाराज यांनी घेतली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर