मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  UPSC Kolhapur : बुक बाइंडरच्या मुलाचा सायकलवरून सुरू झालेला प्रवास थेट IAS पर्यंत पोहोचला, वाचा फरहानची यशोगाथा

UPSC Kolhapur : बुक बाइंडरच्या मुलाचा सायकलवरून सुरू झालेला प्रवास थेट IAS पर्यंत पोहोचला, वाचा फरहानची यशोगाथा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 17, 2024 06:00 PM IST

UPSC Success Story Kolhapur : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरातील फरहान इरफान जमादार याने १९१ वी रँकमिळवून आयएएस पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या यशाचे मुस्लिम तरुणांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.

कोल्हापूरच्या फरहान जमादारचं  यूपीएससीत दैदिप्यमान यश
कोल्हापूरच्या फरहान जमादारचं यूपीएससीत दैदिप्यमान यश

UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा(मुख्य) परीक्षा २०२३ (UPSC CSE 2023)चाअंतिम निकाल (Upsc result) मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा जणांनी यश मिळवले आहे. यामध्ये कदमवाडीतील फरहान इरफान जमादार (Farhan Irfan jamadar) याने १९१ वी रँकमिळवून आयएएस पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या यशाचे मुस्लिम तरुणांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

फरहानच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. मात्र याचा कधीही बाऊ न करता त्याने अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले. तो अजूनही सायकलनेच प्रवास करतो व या सायकलनेच त्याच्या आयुष्याला गती दिली. सायकलवरून सुरू झालेला त्याचा प्रवास थेट आयएएस पदावरून घेऊन गेला आहे.

कोल्हापुरातील कदमवाडीच्या कारंडे मळा येथील फरहानने चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. तीन वेळी अपयश आल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बंद करण्याच ठरवले होते. मात्र कुटूंबीय व मित्रांच्या पाठिंब्याने त्याने चौथ्या प्रयत्नात यशाची कमान सर केली. फरहानच्या वडिलांचा प्रिंटिंगचा व्यवसाय असून ते बुक बाइडिंगचे काम करतात तर आई गृहिणी आहेत.

फरहानचे प्राथमिक शिक्षण कदमवाडीतील सुसंस्कार विद्यालयात जाले. त्यानंतर कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेतले. पुढे सांगलीतील वालचंद कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. मात्र त्याला आयएएस व्हायचे असल्याने त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्ये त्याने नोकरी न करता यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. यावेळी घरातून अभ्यासिकेत जाण्यासाठी तो सायकलचा वापर करत होता.

सकाळी सात ते रात्री ११ पर्यंत सलग दोन वर्षे तो अभ्यास करत होता. त्याने अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. यूपीएससीच्या २०२२ मध्ये मुख्य परीक्षेत त्याला अपयश आले. मात्र त्यातून सावरून त्याने चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. रोज १२-१२ तास अभ्यास हेच यशाचे गमक असल्याचे फरहान सांगतो. फरहानने सांगितले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना शिष्यवृत्ती मिळाल्याने कुटुंबावर फारसा आर्थिक ताण आला नाही.

 

फरहानने सांगितले की, कॉलेजला असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. हा माझा चौथा प्रयत्न होता. यूपीएससी परिक्षेत समाजशास्त्र (Sociology) हा ऐच्छिक विषय घेऊन यूपीएससीची संपूर्ण परीक्षा इंग्रजी माध्यमातून दिली. यापूर्वी तीनवेळा फरहानने मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली होती. मात्र मुलाखतीचा टप्पा गाठता आला नव्हता;परंतु चौथ्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातली.

IPL_Entry_Point

विभाग