मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक, शहरात तणावाचं वातावरण

कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक, शहरात तणावाचं वातावरण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 31, 2024 07:07 PM IST

Kolhapur News : कोल्हापुरात सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. ऐतिहासिक दसरा चौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दगडफेक करण्यात आलेली बस
दगडफेक करण्यात आलेली बस

कोल्हापुरात एका शालेय सहलीच्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. शहरातील दसरा चौक येथे हा प्रकार घडला. दगडफेक झाल्यानंतर जमाव पसार झाला. सहलीच्या बसवर दगडफेक झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

अज्ञातांनी सहलीच्या बसबरोबरच अन्य चारचाकी वाहनांवरही दगडफेक केली. दगडफेक  केल्यानंतर जमाव फरार झाला आहे. शहरातील मुस्लिम बोर्डिंग समोर हा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

कोल्हापूरमध्ये सध्या अंबाबाईच्या दर्शनाबरोबरच शालेय सहलीही कोल्हापूर शहर व जिल्ह्यात येत आहेत. सर्व भाविक आणि पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था दसरा चौक येथे करण्यात आली आहे. याच ठिकाणी उभ्या असलेल्या शाळेच्या एका बसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. त्याचबरोबर आणखी दोन चारचाकी वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम बोर्डिंगसमोरुन बस जात असताना शाळकरी मुलांनी विद्यार्थ्यांनी जय श्री राम व शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. तेव्हा तिथेच उपस्थित असलेल्या जमावाने बसचा पाठलाग करत त्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत दोन- चार चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे. 

शालेय बसवर दगडफेक करणारे कोण होते तसंच, मुस्लिम बोर्डिंगजवळ जाताच जय श्रीरामच्या घोषणा देणारे कोण होते याचादेखील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

WhatsApp channel