मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पावसाळी पर्यटन बनतंय जीवघेणं! भुशी, ताम्हिणीनंतर कोल्हापुरातील दूधगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

पावसाळी पर्यटन बनतंय जीवघेणं! भुशी, ताम्हिणीनंतर कोल्हापुरातील दूधगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

Jul 01, 2024 06:15 PM IST

Kolhapur News : निपाणीहून कोल्हापुरात पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा काळमवाडी येथील दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरातील दूधगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू
कोल्हापुरातील दूधगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात एकाच कुटूंबातील पाच जन वाहून गेल्यानंतर पुण्यातील ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यानंतर आता कोल्हापुरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील दोन तरुणांना वर्षा पर्यटन जीवावर बेतलं आहे. निपाणीहून कोल्हापुरात पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा काळमवाडी येथील दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गणेश चंद्रकांत कदम (वय १८) आणि प्रतीक पाटील (वय २२ दोघे रा. निपाणी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे असून ते निपाणीहून वर्षा पर्यटनासाठी आले होते.

कोल्हापूरसह पश्चिम घाटमाथ्यावर गेल्या आठवड्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यातच वर्षा पर्यटनासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पाण्याच्या वेगवान प्रवाहात एक कुटुंब वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. आता कोल्हापुरात देखील नदीच्या प्रवाहात दोन युवक वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निपाणीतून १३ जणांचा समूह वर्षा पर्यटनासाठी राधानगरी येथे आले होते. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गणेश कदम हा तरुण पोहता येत नसतानाही दूधगंगा नदी पात्रात उतरला. मात्र त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो डोहात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र प्रतीक पाटील पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने दोघेही प्रवाहात वाहून जाऊ लागले. त्यांच्या मित्रांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र नदीच्या तीव्र प्रवाहात दोघेही प्रवाहात वाहून गेले. यापैकी प्रतीक पाटील हा वाहनचालक होता.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची एक तुकडीही घटनास्थळी पोहोचली आहे. गेल्या महिन्यातही नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू झाला होता.

भुशी धरण परिसरात एकाच कुटूंबातील ५ जण गेले वाहून -

वर्षा पर्यटनासाठी अनेक धरण व धबधब्यांच्या ठिकाणी गर्दी होत आहे. पुण्यातील लोणावळा येथे भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये पुण्यातील अन्सारी कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील उमटले.

ताम्हिणी घाटात एक तरुण गेला वाहून -

पुण्यातील ताम्हिणी घाटात स्टंट करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. पाण्यासोबत तो वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे. स्वप्नील त्याच्या जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आला होता.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर