Kolhapur news : नाताळनंतर सर्वत्र नववर्षांच्या स्वागताची धूम सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील चित्री नदीपात्रामध्ये (Chitri River) पोहायला गेलेल्या एकाच कुटूंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने आजरा तालुक्यातील कासारकांडगाव गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आजरा येथून जवळच्या अंतरावर असलेल्या चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. ॲड. रुझारीओ अंतोन कुतिन्हो (वय ४०), फिलीप अंतोन कुतिन्हो (वय ३६) आणि लॉईड पास्कोन कुतिन्हो (वय ३०) अशी त्यांची नावे आहेत.
नाताळ सणाची सुट्टी असल्याने रविवारी दुपारी आजरा शहरातील कुतीन्हो कुटुंबातील तिघेजण पोहण्यासाठी चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यावर गेले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. ही घटना समजताच कासारकांडगाव येथील ग्रामस्थांनी बंधाऱ्य़ाकडे धाव घेत शोधमोहीम सुरू केली. बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. आजरा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
संबंधित बातम्या