नुकत्याच पार पडलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक गटाने एकहाती सत्ता राखली होती. मात्र आता महाडिक गडाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना साखर आयुक्तांनी राजाराम सहकारी साखर कारखान्यातील १२७२ सदस्य अपात्र ठरवले आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक व ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबीयांतील १० सदस्यांचा समावेश आहे.
राजारामची निवडणूक तीन महिन्यापूर्वीच पार पडली आहे. कारखान्याच्या निवडणुकी आधीच बोगस सभासदांचा प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सतेज पाटलांनी केली होती. यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्यानंतरही कारखान्याची निवडणूक घेण्यात आली व त्यामध्ये महाडिक गटाने बाजी मारत सत्ता कायम ठेवली.
सतेज पाटील यांच्या तक्रारीवर निर्णय घेत साखर आयुक्तांनी या कारखान्यातील तब्बल १२७२ सदस्य अपात्र ठरवले आहेत. यामध्ये महाडिक कुटुंबातील १० सदस्यांचा समावेश आहे. यामुळे महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे.
या निर्णयानंतर सतेज पाटील गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे, एका निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, मार्च-एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आमच्या आघाडीच्या उमेदवारांपैकी ३० उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरवून निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढले. तरीसुद्धा सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण १२,३३६ इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता.