Kolhapur ST Bus stop murder : कोल्हापुरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर बस स्थानकावर एक मृतदेह सापडला होता. या मृतदेहाचं गूढ उकललं आहे. सासू सासऱ्याने धावत्या बसमध्ये जावयाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर त्याचा मृतदेह हा स्थानकावर सोडून ते पसार झाले होते. या प्रकरणी सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
संदीप शिरगावे असं हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे. संदीप हा मूळचा शिरोळचा येथील रहिवासी आहे. बुधवारी मध्यरात्री संदीपची हत्या करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी कोल्हापूर बसस्थानकावर त्याचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत या प्रकरणी तपास सुरू केला. तपसा दरम्यान, सासू सासरे यांनी मिळून त्याचा खून केल्याचं उघड झालं.
संदीप शिरगावे हा बुधवारी रात्री गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला विनावाहक गाडीतून येत होता. यावेळी त्याच्या सासू सासऱ्याने गाडीतच त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह हा कोल्हापूर बसस्थानकावर आणून टाकून दिल होता.
संदीप शिरगावे याला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन पत्नी आणि मुलाला त्रास देत असे. त्याला समजावून सांगूनही त्याने पत्नीला मारणे सोडले नव्हते. यामुळे पत्नीचे आई वडील संतापले होते. मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा काटा काढण्याचे त्यांनी ठरवलं. बुधवारी रात्री तिघे जण गडहिंग्लजवरुन विना वाहन गाडीतून कोल्हापूर येथे येत होते. याच फायदा त्यांनी घेतला.
गाडीत बसले असताना रात्री सर्व झोपलेले असल्याची खात्री करून गाडीतच जावयाचा गळा दोघांनी आवळला. यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह हा बस स्टँडवर नेऊन ठेवला. सकाळी बस स्थानकाच्या परिसरात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या हत्या प्रकरणाची उकल केली आहे. पोलिसांनी जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्याला अटक केली आहे.