Kolhapur News: कोल्हापुरातील राधानगरी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. दिवाळीचा बाजार करून घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. येळवडे ते राशिवडेदरम्यान मयत दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (२९ ऑक्टोबर २०२४) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
संजय वसंत कांबळे (वय, ४८) आणि सुरेखा संजय कांबळे (वय, ४०) अशी मृतांची नावे आहेत. मृत दाम्पत्याला चार मुली असून ते राधानगरीतील पुंगाव येथे वास्तव्यास होते. संजय यांचा सेंट्रिंगचा व्यवसाय होता. तर, त्यांची पत्नी भोगावती-परिते येथे एका दुकानात कामाला होत्या. दरम्यान, संजय आणि सुरेखा हे मंगळवारी संध्याकाळी दिवाळीची खरेदी करून घरी परतत होते. मात्र, राशिवडे-येळवडेच्या सीमेवर आल्यानंतर येळवडेकडून माल उतरून राशिवडेकडे निघालेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संजय आणि सुरेखा जवळपास ३० फूट लांब फरपटत गेले आणि टेम्पो उजव्या बाजूच्या नाल्यात पडला.
या अपघातात संजय यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी सुरेखा यांना जखमी अवस्थेत त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशीरा दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत दाम्पत्याचा चार मुली आहेत. त्यांच्यापैकी एका मुलीचा विवाह झाला. ती बाळंतपणासाठी माहेरी आली आहे. उर्वरित तीन मुली अनुक्रमे पाचवी, आठवी आणि बारावीत शिकत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मनमाडमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास नांदगाव मार्गांवर पानेवाडीजवळ भरधाव टँकरने दुचाकीला जोरादार धडक दिली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाला आहे. त्यांच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
संबंधित बातम्या