कोल्हापुरातील कायमच गजबजलेल्या रंकाळा तलाव परिसर गुरुवारी (४ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास तरुणाच्या हत्येने हादरला. यादवनगरातील तरुणाचा टोळक्याने पाठलाग करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी हा खून झाल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अजय दगडू शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रंकाळा तलावाजवळ पाच तरुणांनी पाठलाग करत तलवारी, कोयत्याने वार करत तरुणाचा खून केला. हत्या केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले.
राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. त्यातच कोल्हापुराच दिवसाढवळ्या लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या हत्याकांडाने कोल्हापुरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. शहरातील गर्दीचं ठिकाण असलेल्या रंकाळा परिसरात एका तरुणाचा पूर्ववैमनस्यातून भररस्त्यात पाठलाग करून त्याची हत्या केली. ही घटना आज साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. रंकाळा चौपाटीवर शेकडो नागरिकांच्या डोळ्यासमोर तरुणावर सशस्त्र हल्ला करत त्याला संपवलं. मृत अजय शिंदे यादव नगरातील असून टोळी युद्धातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत अजय शिंदे हा यादव नगरात वास्तव्यास होता व तोही एक गुंड होता. यादव नगरातीलच टोळी युद्धातूनच ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. हत्येनंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला.
कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या चौपाटीवर सायंकाळच्या सुमारास दररोज नागरीक आणि पर्यटकांची गर्दी होती. सध्या चौपाटी परिसरात बांधकाम केले जात असल्याने रंकाळ्याच्या बाजुला असणाऱ्या रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी असते. यावेळी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक चार ते पाच जण धावत येऊन एका तरुणाचा पाठलाग करू लागले. त्यांनी तरुणावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रंकाळा चौपाटीवर लोकांची मोठी वर्दळ असतानाच हा प्रकार घडल्याने गुन्हेगारांना कोणाचे भय उरले नसल्याचे समोर आले आहे.