Kokan Rain Update: सध्या मुंबईसह वेगवेगळ्या परिसरात आणि जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार फटकेबाजी सुरू आहे. एकीकडे मुंबईत सलग रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. तर, दुसरीकडे कोकणात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता रौद्ररूप धारण केले आहे. कोकणातील काही भागांमध्ये सध्या आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे कोकणातील व्हाळ आधीच दुथडी भरून वाहत होते. त्यातच आता सिंधुदुर्ग, रत्नागिरमधील महत्त्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नद्यांना पूर आल्याने पाणी थेट शेतात घुसू लागले आहे. इतकंच नाही तर, सिंधुदुर्गमधील अनेक घरांना पाण्याने वेढलं आहे. या पावसामुळे आणि नदीला आलेल्या पुरामुळे कोकणवासीयांना घरातून बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे आता तेथील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन देखील सक्रिय झाले आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गासह अनेक ठिकाणी वाहतूक देखील ठप्प झाली आहे. कणकवली-कुडाळमधील बाजारपेठांमध्ये आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांना आणि रस्त्यांनाही अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या कोकणातील काही भागांमध्ये एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले आहे.
जुलै महिना सुरू झाल्यापासूनच पावसाने थैमान घलायला सुरुवात केली आहे. मुंबई, विदर्भासह कोकणातही पावसाने धुमशान घातले आहे. सिंधुदुर्गमधील बहुतांश गावात १००ते १३०मिमीपर्यंत पाऊस झाल्याने लोक घरातच अडकून पडले आहेत. पावसाचा जोर आता तिसऱ्या दिवशीही कायम असून, प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. कणकवलीतील गड नदीसह, कुडाळ मधील भंगसाळ नदी, वेताळ बांबार्डे, हुरमळा, हातेरी, कर्ली, तेरेखोल आणि तिलारी या नद्यांनी आता दुथडीवरून वाहण्यास सुरुवात केली आहे. यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, त्या भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने तेथील स्थानिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
तर पूरस्थितीमुळे आता स्थानिक शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या असून, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. वैभववाडी येथे देखील पावसाचा असा जोर कायम असून, गड नदीला आलेल्या पुराचे पाणी आशिये गावातील भातशेतीत शिरले आहे. त्यामुळे संपूर्ण गावात पाणीच पाणी झाले आहे. खालचीवाडी येथील ३०ते ३५घरांचा संपर्क तुटला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित बातम्या