Pune Police attack : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीएत. आता तर पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर टोळक्यानं थेट कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रत्नदीप गायकवाड असं हल्ला झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. गायकवाड हे वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्याचे एपीआय रत्नदीप गायकवाड ससानेनगर इथं गस्तीवर होते. ते ड्युटी करत असताना तिथं दोन मोटारसायकल चालकांमध्ये वाद झाला. वादामुळं गर्दी जमलेली पाहून गायकवाड हे वाद सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी निहाल सिंग टाक या गुंड प्रवृत्तीच्या तरुणानं त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर निहाल सिंग टाक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
निहाल सिंग आणि राहुल सिंग असे या आरोपींची नावं असून हे दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. याआधी त्यांच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून यापूर्वी पिस्तुलही जप्त करण्यात आलं होतं.
पुणे शहरातील गुन्हेगारीची चर्चा सातत्यानं होत असते. गेल्या काही वर्षांपासून शहरात कोयता गँगची दहशत आहे. गुन्हेगारांची जाहीर परेड काढून व वेगवेगळ्या पद्धतीनं कारवाई करूनही गुन्हे कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. आतापर्यंत दोन गटांत हाणामारी होत असे. मात्र, आता पोलिसांवरच हल्ले होऊ लागल्यानं पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे.