मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena : किशोरी पेडणेकरांनी ट्विट केला बाळासाहेबांचा ‘तो’ फोटो; दसरा मेळाव्याबाबत सूचक संकेत

Shiv Sena : किशोरी पेडणेकरांनी ट्विट केला बाळासाहेबांचा ‘तो’ फोटो; दसरा मेळाव्याबाबत सूचक संकेत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 22, 2022 02:30 PM IST

Dasra Melava 2022 : दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यातच आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी एक फोटो शेयर करत सूचक संकेत दिले आहेत.

Shiv Sena Dasra Melava 2022
Shiv Sena Dasra Melava 2022 (HT)

Shiv Sena Dasra Melava 2022 : मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात मोठा राजकीय संघर्ष पेटलेला आहे. महापालिकेनं शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर आता शिवसेनेनं हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणात कोर्टानं सुनावणी घेतली असून त्याचा निकाल उद्या येण्याची शक्यता आहे.

परंतु आता मुंबई महापालिकेनं किंवा हायकोर्टानं परवानही नाकारली तरी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो शेयर केला आहे. याशिवाय त्याला दसरा मेळाव्याबाबतचं कॅप्शन दिलं आहे. त्यात शिवाजी पार्कवरच शिवसेना दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही असल्याची दिसून आलं आहे.

पेडणेकर यांनी ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे कारच्या टपावर उभं राहून भाषण करताना दिसत आहे. त्यामुळं जर शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाही, तर उद्धव ठाकरे अशाच पद्धतीनं भाषण करतील की काय?, याबाबत अंदाज लावला जात आहे. त्याचबरोबर त्यांनी या फोटोला आतुरता दसरा मेळाव्याची. पुनरावृत्ती होणारच, असं कॅप्शन दिल्यानं आता शिवसेना अजूनही शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट होतंय.

मुंबई महापालिकेनं शिंदे गट किंवा शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी देण्यास नकार दिला आहे. कुणालाही दसरा मेळाव्याची परवानगी दिल्यास शहरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल महापालिकेनं मुंबई पोलिसांना दिला आहे.

WhatsApp channel