Farmer Long March : शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर किसान सभेची माघार-kisan sabha decided to suspend farmers long march in thane today see details ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Farmer Long March : शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर किसान सभेची माघार

Farmer Long March : शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर किसान सभेची माघार

Mar 18, 2023 08:10 PM IST

Farmer Long March : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर किसान सभेनं लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Farmer Long March Nashik To Mumbai
Farmer Long March Nashik To Mumbai (HT)

Farmer Long March Nashik To Mumbai : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेला किसान सभेचा लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. किसान सभेच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर किसान सभेनं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता शेतकरी लाँग मार्च ऐवजी विजयी मार्च करत ठाण्यातून नाशिकच्या दिशेनं परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. किसान सभेचे नेते जेपी गावित यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून आम्हाला विश्वासात घेऊनच सरकारनं निर्णय घेतला आहे. बैठकीत जे ठरलं त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सोपवली असून आम्ही समाधानी झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या मागण्या येत्या काही दिवसांत पूर्ण केल्या जातील, असं जेपी गावित यांनी म्हटलं आहे.

शेतमालाचा चांगला भाव मिळावा, सातबारा कोरा करावा, नुकसान भरपाई मिळावी आणि इतर अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता. शेतकऱ्यांचा विराट मोर्चा ठाण्यात पोहचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर किसान सभेच्या नेत्यांनी लाँग मार्च स्थगित करत असल्याची घोषणा केली. किसान सभेच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं आदिवासी शेतकऱ्यांचा समावेश होता. मोर्चात वन हक्क कायदा आणि जमिनीच्या हक्काशी संबंधित इतर समस्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली होती. कर्जमाफी, वीज, पीक विमा, वृद्धापकाळातील पेन्शन वाढ, योजना कामगारांचे वेतन, आदी मागण्याही किसान सभेकडून करण्यात आल्या होत्या.

किसान सभेचे अशोक ढवळे, जेपी गावित, अजित नवले, विनोद निकोले, उदय नारकर, डीएल कराड, उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यीय शिष्टमंडळानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारनं किसान सभेच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा ठाण्यात पोहचताच शिंदे-फडणवीस सरकारनं तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचं सांगत किसान सभेनं आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.