विरोधी पक्षातील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिलेली मोठी जबाबदारी नाकारली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार समितीच्या सदस्यपदी किरीट सोमय्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आपण २०१९ पासून पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून ही जबाबदारी विनम्रपूर्वक नाकारत असल्याचे पत्र किरीट सोमय्या यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच रावसाहेब दानवे यांना लिहिलं आहे.
किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. मात्र किरीट सोमय्या आपल्या पक्षातील निर्णयामुळे कमालीचे नाराज झाले आहे. किरीट सोमय्यांनी पक्षाला घरचा आहेर देत आपली नाराजी पत्रातून बोलून दाखवली आहे. एवढंच नाही, एवढी अपमानस्पद वागणूक देऊ नका, अशी विनंतीच केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सोमय्या यांच्याकडे निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल,गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण, भाजपच्या या घोषणेमुळे सोमय्या कमालीचे नाराज झाले असून बावनकुळे यांना पत्र लिहून आपली नाराजी प्रकट केली आहे.
आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूकप्रचार संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली, ही पद्धत चुकीची आहे,मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असं म्हणत सोमय्यांनी आपली नाराजी पत्रातून व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले की, मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो. या समितीत काम करण्यास मी असमर्थता व्यक्त करतो. गेली साडे पाच वर्षे, म्हणजे १८ फेब्रुवारी २०१९ पासून मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे.
भाजपचा सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढले. त्यावेळी तीन वेळा माझ्यावर जीवघेणे हल्लेही झाले. मी आपल्या या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार.
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे २०१४ च्या लोकसभेतईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. २०१९ साली शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने त्यांचे तिकीट नाकारले होते.