Pune Gultekadi Murder: पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. गेल्या तीन दिवसांत हत्येच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची संपत्ती आणि टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतांना सासवड रस्त्यावर हॉटस्पॉट न दिल्याने एका बँक मॅनेजरची हत्या करण्यात आली होती. यानंतर मंगळवारी रात्री गुलटेकडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या घरात घुसून कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. डायसप्लॉट गुलटेकडी येथे ही घटना मग्नलवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुनील सरोदे असे गुलटेकडी येथे खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तर साहिल कांबळे, रोहन कांबळे या दोघा भवांनी त्याची हत्या केली आहे. जुन्या वादातून सुनील सरोदेचा खून करण्यात आला आहे. आरोपी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. साहिल मोक्का मधून २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोक्यातील जामिनावर सुटलेले रोहन कांबळे, शिवशरण कांबळे यांनी सुनील सरोदे याची हत्या केली. ७ जुलै रोजी आरोपी रोहनचा वाढदिवस होता. त्यावेळी सरोदेने त्याला मारहाण केली होती. त्या रागातून मंगळवारी रात्री कांबळे बंधू त्याच्या घरी गेले. त्यांनी सुनील सरोदेचा भाऊ गणेश याला मारहाण सुरू केली. त्यावेळी सुनील मध्ये आला. आरोपीने कोयता काढून त्याच्या गळ्यावर वार केला. हा घाव वर्मी बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिकेत दूधभातेसह १३ जणांना अटक केली आहे. हे आरोपी रायगड जिल्ह्यातील माणगाव ओैद्योगिक वसाहत परिसरातून लपून बसले होते. मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली. वनराज आंदेकर याची नाना पेठेतील डोके तालीम चौकात गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात अलायी होती. याप्रकरणी बहीण संजीवनी जयंत कोमकर, मेहुणा जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सोमनाथ गायकवाड याचा साथीदार अनिकेत दुधभाते व इतर साथीदार फरार होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. यावेळी धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात गायकवाड व दहिभाते राहायला असून आरोपी माणगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तब्बल १३ आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.