Khadakwasla Dam Pune: पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यातील घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, सोमवार पासून पावसाचा जोर वाढला असल्याने पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत असणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक झाल्याने खडकवासला धरण भरले असून मध्यरात्री पासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरवातीला ४ हजार क्युसेक तर सकाळी ७ पासून १५ हजार ४१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी केली आहे.
पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. आठवड्याभरापासून पावसाचा जोर कायम आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहणार आहे. शनिवार पासून पुण्यात पावसाचा जोर वाढला असून रात्रीच्या सुमारास व दिवसा पावसाच्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत असल्याने पुणेकर सुखावले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुकीवर देखील परिमाण झाला आहे. हवामान विभागाने पुण्याला व घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सतत सुरू असणाऱ्या या पावसामुळे पुण्यातील धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. खडकवासला धरण साखळी परिसरात देखील पावसाचा जोर वाढला असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने मध्यरात्री पासून खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये मध्य रात्री पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज सकाळी ६.३० वाजता हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी ७ वाजता धरणातून ९ हजार ४८६ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असून यात आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो. पावसाचे प्रमाण व येव्यानूसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. खडकवासला धरण जुलै महिन्यातच भरल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता सध्या मिटली आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाकडून मंगळवारी रात्री धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. बुधवारी पहाटे खडकवासला धरण ९५ टक्के भरले होते. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरूवाट करण्यात आली आहे. यात कमी जास्त प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. तरी पुणे महानगर पालिका व पोलीस प्रशासन खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नदी पात्रात कोणीही उतरू नये व पात्रात ठेवण्यात आलेले साहित्य, जनावरे तात्काळ हलविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.