मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Karnataka Border: कर्नाटकचा पुन्हा खोडसाळपणा, 'तुबची बबलेश्‍वर'मधून जतमधील तिकोंडी तलावात सोडले पाणी

Karnataka Border: कर्नाटकचा पुन्हा खोडसाळपणा, 'तुबची बबलेश्‍वर'मधून जतमधील तिकोंडी तलावात सोडले पाणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 01, 2022 11:32 PM IST

कर्नाटकने तुबची बबलेश्वर योजनेतून दुष्काळी जतमधील तिकोंडी तलावात पाणी सोडल्याने तलाव ओसंडून वहात आहे. सीमाभागातील गावांना कर्नाटकच पाणी देऊ शकतं हे दाखवण्याचा खोडसाळपणा कर्नाटकने केला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील अनेक गाव पाण्याच्या टंचाईमुळे अनेक गावांनी अन्य राज्यात सामील होण्याचा इशारा सरकारला दिला आहे. जत तालुक्यातील ४० गावे व अक्कलकोटमधील काही गावे कर्नाटकमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील काही गावांनी तेलंगाणात जाण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जतमधील गावांच्या समावेशाबद्दल कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगून वादाला तोंड फोडले होते. आता पुन्हा एकदा कर्नाटकने महाराष्ट्राला डिवटले आहे. 

कर्नाटकने जत पूर्व भागातील तिकोंडी तलावात पाणी सोडल्याने तलाव तुडूंब भरून वाहू लागला आहे. दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जत दौर्‍यावर असताना ही बाब समोर आली. कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्‍वर योजनेतून पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचले आहे. सीमावर्ती भागास कर्नाटकच तातडीने पाणी देऊ शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कर्नाटकने जतमधील ४० गावांवर हक्क सांगितल्यानंतर जतमधील पाणी प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जत पूर्व भागातील ६५ गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजनेला राज्य सरकारने तत्वत: मंजुरी दिली असून ही योजना पूर्ण होईपर्यंत तातडीने पूर्व भागातील काही तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरून घेता येउ शकतील का याचा आढावा सरकारकडून घेतला जात आहे. याची पाहणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी जत दौर्‍यावर होते.

कर्नाटकने सीमावर्ती भागासाठी तुबची बबलेश्‍वर योजना गतीने पूर्ण केली असून या योजनेतून कर्नाटकातील इंडी व चडचणसाठी जत पूर्व भागातील तिकोंडीसह काही गावातून नैसर्गिक उताराने पाणी जाऊ शकते. याच स्थितीचा फायदा उठवत कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने  बुधवारपासून या योजनेचे पाणी यतनाळ ओढापात्रात सोडले असून या पाण्यामुळे तिकोंडी तलाव गुरूवारी ओसंडून वाहू लागला आहे. 

IPL_Entry_Point