मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Border Dispute : कन्नड वेदिके संघटनेची महाराष्ट्रात घुसखोरी; तिकोंडी-उमराणीत कानडी ध्वज फडकावला

Border Dispute : कन्नड वेदिके संघटनेची महाराष्ट्रात घुसखोरी; तिकोंडी-उमराणीत कानडी ध्वज फडकावला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 29, 2022 10:16 AM IST

Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अक्कलकोट, जत आणि सोलापूरवर दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावाद चिघळला आहे.

kannada vedike organization hoisted flag in maharashtra
kannada vedike organization hoisted flag in maharashtra (HT)

kannada vedike organization hoisted flag in maharashtra : अक्कलकोट, जत आणि सोलापूर शहरावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाचा प्रश्न आणखी पेटला आहे. कर्नाटकच्या सीमेलगत असलेल्या तिकोंडी आणि उमराणीतील ग्रामस्थांनी सभा घेत आमच्या समस्या सोडवा नाही तर आम्ही कर्नाटकमध्ये सामील होऊ, असा इशारा महाराष्ट्र सरकारला दिल्यानंतर आता कर्नाटकातील कन्नड वेदिके संघटनेनं तिकोंडी आणि उमराणी गावात कर्नाटकचा कानडी ध्वज फडकावला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कन्नड वेदिके संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील तिकोंडी आणि उमराणीतील गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्या दोन्ही गावातील लोकांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर एकत्र होत महाराष्ट्र सरकारचा निषेध करत कानडी ध्वज फडकावला. त्यानंतर दोन्ही गावातील ग्रामस्थांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात सामील होण्याची इच्छा कन्नड वेदिके या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलून दाखवली.

कर्नाटक रक्षण वेदिका संघटनेचे नेते सिध्दु वडेयार यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह जत तालुक्यातील पाणी संघर्ष समितीचे नेते सुनिल पोतदार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भुवनेश्वर देवीची प्रतिमा भेट देत पोतदार यांचा सत्कार केला. कर्नाटक सीमेलगत असलेल्या, तिकोंडी, उमराणी, शेगाव, आळगे, कल्लकर्जाळ, दर्शनाळ, कोरसेगाव, मुंडेवाडी आणि केगाव या गावांमधील ग्रामस्थांना सातत्यानं पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. याशिवाय या गावांमध्ये रस्ते आणि वीजेचीही समस्या कायम असल्यानं लोकांनी याबाबत वेळीच उपायोजना करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. या समस्या सोडवल्या गेल्या नाही तर सर्व गावं कर्नाटकात सामील होणार असल्याचा इशारा दिला आहे.

सीमाप्रश्नावर कायदेशीर लढाईसाठी कर्नाटक सरकारनं जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल राज्यातील काही विधिज्ञांशी या प्रकरणावर चर्चा केली असून ते आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्यानं या सुनावणीकडे दोन्ही राज्यांतील लोकांचं लक्ष लागलेलं आहे.

WhatsApp channel