मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'अंबिका मसाले'च्या संस्थापिका कमल परदेशी यांचे निधन, शेतमजूर ते कंपनीच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास

'अंबिका मसाले'च्या संस्थापिका कमल परदेशी यांचे निधन, शेतमजूर ते कंपनीच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 02, 2024 05:57 PM IST

Kamal Pardeshi Passed Away : अंबिका मसाल्याच्या प्रवर्तक कमल परदेशी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या कर्करोगांशी लढा देत होत्या.

Kamal Pardeshi Passed Away
Kamal Pardeshi Passed Away

अंबिका मसाले घराघरात पोहोचवणाऱ्या कंपनीच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. कमल परदेशी गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी लढत होत्या. मंगळवारी (२ जानेवारी) वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दौंड तालुक्यातील खुटबाव या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

२००० साली बचत गटातील महिलांना एकत्रित करत त्यांनी अंबिका मसाले हा ब्रँड तयार केला होता.  स्वतः निरक्षर असूनही त्यांनी आपल्या मसाल्याचे मार्केटिंग जगभरात केले. आपल्या मसाला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हाताला काम देत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली होती. त्यांना आदर्श उद्योजिका सहित अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. जर्मनीच्या चांसेलार अँगेला मर्केल यांनीही कमलताईंच्या कामाचं कौतुक केलंय.

कमल परदेशी यांचा शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाले कंपनीच्या  चेअरमन असा थक्क करणारा प्रवास आहे. शेतमजूर असणाऱ्या मलताई परदेशी यांनी मजुरीच्या पैशातून मसाला व्यवसाय सुरू केला. कमल यांनी आपल्या झोपडीतूनच मसाल्याच्या  उद्योगाची  सुरुवात केली होती. आता त्यांचे मसाले भारतातील लहान मोठी दुकाने तसेच मोठमोठ्या मॉलसोबतच परदेशी बाजारपेठांतही विकले जातात. 

कमल परदेशी यांनी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. 

कमल परदेशी व महिलांनी सुरुवातीला पुण्यातल्या सरकारी कार्यालयाबाहेर मसाले विकले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईतल्या प्रदशर्नांमध्ये आणि मग बिग बाझारमध्ये मसाल्यांची विक्री केली. आता अंबिका मसाल्यांना देशभरात मोठी मागणी आहे. त्याचबरोबर जर्मनीतही त्यांच्या मसाल्यांना मोठी मागणी आहे.

WhatsApp channel