Russell Viper Snake found in Lift Duct In Dombivli: डोंबिवली येथून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी माहिती समोर आली. डोंबिवलीतील देसाई परिसरामधील एका बांधकामाधीन इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये मोठा विषारी रसेलचा व्हायपर साप आणि त्याची २५ पिल्ले आढळून आली. याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र विशाल सोनावणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या सापांची सुटका केल्याची माहिती समोर आली.
सर्पमित्र विशाल सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील देसाई परिसरातील एका बांधकामाधीन इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये साप आणि त्याची पिल्ले आढळून आल्याचा त्यांना फोन आला. यानंतर सोनावणे यांनी त्यांचे सहकारी समद खान घटनास्थळी भेट दिली असता रसेलचा व्हायपर जातीचा भलामोठा साप २५ पिल्लांसह आढळून आला. या सापाला जंगलात सोडण्यात आले. सापाने अंडी न घालता पिल्लांना जन्म दिल्याचे सोनावणे यांनी सांगितले.
रसेल व्हायपरची गणना जगातील सर्वात धोकादायक सापांमध्ये केली जाते, हा साप भारतातही आढळतो. भारतात आढळणाऱ्या सापांमध्ये हा अतिशय धोकादायक आहे. या सापाचे विष इतके धोकादायक आहे की, या सापाने एखाद्याला दंश केला तर काही वेळातच त्या व्यक्तीचे अनेक अवयव निकामी होतात. हा साप अजगरसारखा दिसतो, ज्याच्या त्वचेवर गोल डाग असतात.
हा साप जेव्हा एखाद्या व्यक्तीला दंश करतो, तेव्हा इतर सापांच्या तुलनेत भरपूर विष सोडतो. अनेक अहवालांनुसार, हा साप एखाद्याला चावल्याने १२०- २५० मिलीग्राम विष सोडतो. या सापाच्या मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता वाढते आणि रक्त गोठण्यास सुरुवात होते. याशिवाय, शरीरात खूप सूज येते आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. हा साप केवळ विषारीच आहे असे नाही तर त्याचा वेगही खूप आहे. हा साप इतका वेगवान आहे की, तो काही सेकंदात त्याच्यापासून पाच फूट दूर उभ्या असलेल्या शिकारवर हल्ला करू शकतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सापाच्या दंशानंतर एखाद्याचे जगणे कठीण आहे. मात्र, तरीही एखादा व्यक्ती वाचला तर, त्याचे अवयव काम करणे बंद करतात आणि आयुष्यभर त्याला शरिरासंबंधित अनेक समस्या उद्धवतात. याशिवाय, अनेक आवश्यक हार्मोन्स नष्ट होतात. अनेकांचे केस उगवणे थांबते आणि वजनही कमी होते. यामुळे हा साप आशियातील सर्वात धोकादायक साप मानला जातो.
संबंधित बातम्या