Kalyan Crime News : कल्याण येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू पार्टीत एका छोट्याशा गोष्टीवरून शिविगाळ करणे एकाच्या जीवावर बेतले आहे. दारू पितांना शिवी दिल्याने संतापलेल्या मित्राने आपल्या मित्राचीच गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोघे जण फरार आहेत.
राजन उर्फ जानू येरकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रोहित भालेकर, समीर चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. तर परवेज शेख आणि सुनिल वाघमारे हे दोघे आरोपी फरार आहेत. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार असलेल्या मित्रांनी दारू पार्टी आयोजित केली होती. टिटवाळा ग्रामीण भागातील म्हारळ येथील सूर्यानगर परिसरात हे पाच मित्र दारु पित बसले होते. रोहित भालेकर परवेज शेख, सुनिल वाघमारे, समीर चव्हाण आणि राजन येरकर यांची दारु पार्टी सुरू असताना राजन आणि एकात वाद झाला. सर्व जण एकमेकांना दारूच्या नशेत शिवीगाळ करत होते. या दरम्यान रोहित भालेकर याने परवेजच्या कमरेला असलेल्या देशी कट्टा काढून राजन येरकरवर गोळी झाडली.
या गोळीबारात राजन येरकर गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी वेगाने हालचाली करत रोहित भालेकर आणि समीर चव्हाण या दोघांना अटक केली. तर परवेज शेख आणि सुनिल वाघमारे हे फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे म्हारळ परिसरात खळबळ उडाली आहे.