Kalyan Marathi Family Assault Case : कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स या सोसायटीत एका धनदांडग्या परप्रांतीयाकडून मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. ठाकरेंच्या शिवसेनेनं हा मुद्दा सभागृहात उचलला. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. ‘या प्रकरणातील दोषी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला सोडणार नाही,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
शिवनेसेचे (उबाठा) आमदार सुनील प्रभू यांनी माहितीच्या मुद्द्याच्या आधारे कल्याणमध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य केलं. 'कल्याणमधील एका सोसायटीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात अकाऊंट्स मॅनेजर असलेले अखिलेश गुप्ता राहतात. त्याच इमारतीत विजय कळविट्टेकर हे मराठी गृहस्थ राहतात. शुक्ला यांच्या पत्नी दरवाजाबाहेर रोज धूप लावतात म्हणून या दोन कुटुंबात भांडण झालं. त्यावरून शुक्ला यांनी बाहेरच्या लोकांना आणून कळविट्टेकर यांना मारहाण केली. तसंच मराठी माणसाच्या नावानं शिवीगाळ केली, असं प्रभू यांनी सांगितलं.
‘तुम मराठी लोग गंदे हो, तुम्हारी औकात नही है… तुम जैसे ५० लोग रोज मेरे सामने झाडू मारते हो…’ असं ते शुक्ला बोलले. कोण आहे हा शुक्ला? मुख्यमंत्री कार्यालायत त्याला सपोर्ट करणारा कोण आहे? मराठी माणसाचा हा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, असं सुनील प्रभू यांनी ठणकावलं. या शुक्लावर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही प्रभू यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभू यांच्या मागणीला प्रतिसाद दिला. 'महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात मराठी माणसावर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. कल्याण प्रकरणाचा तपास करून संबंधित व्यक्तीवर त्याच्या पदाची आणि सामाजिक ओळखीची काहीही हयगय न करता योग्य कारवाई केली जाईल. तो कितीही मोठ्या बापाचा असला तरी सोडणार नाही. त्यासंदर्भात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील. प्रशासनाकडून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मान आणि सन्मान कायम राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
संबंधित बातम्या