मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan News : प्रियकराच्या मदतीने पतीचा चिरला गळा, दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला

Kalyan News : प्रियकराच्या मदतीने पतीचा चिरला गळा, दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 29, 2024 10:23 PM IST

Kalyan Crime news : बालपणापासूनच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कल्याणमध्ये समोर आली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

कल्याणमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने काटा काढला. पतीला संपवण्यासाठी दोघांनी चार महिने नियोजन केल्याचे समोर आले आहे. आधी पतीचा गळा चिरून हत्या केली व मृतदेहाला दगड बांघून विहिरीत फेकला होता. ही कल्याण जवळील आडिवली परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.

चंद्रप्रकाश लोवंशी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून. याप्रकरणी पत्नी रीता लोवंशी आणि तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी चंद्रप्रकाशला संपवण्यासाठी चार महिन्यांपासून कट रचला होता. त्यांनी चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याची तक्रारही मानपाडा पोलिसात नोंदवली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडिवली गावामधील एका पाण्याने भरलेल्या विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळला. त्या व्यक्तीचा केवळ हात दिसत होती. यांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर मृतदेहाच्या कमरेला दोरी बांधल्याचे दिसले. दोरीच्या दुसऱ्या टोकाला भलामोठा दगड बांधल्याचे दिसले.

मृत व्यक्तीचा गळा धारदार शस्त्राने चिरल्याचे तसेच त्याच्या पाठीवर आणि उजव्या पायाच्या गुडघ्यावर जखमा असल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांसमोर एक आव्हान होते. पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी रिता चंद्रप्रकाश लोवंशी हिची चौकशी सुरू केली. त्यावेळी तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती समजली. आडिवली येथे राहणाऱ्या तिच्या प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

रिता आणि विश्वकर्मा यांच्यात लहानपणापासुन प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही ते कायम होते. प्रेमात अडसर ठरत असल्याने त्यांनी चंद्रप्रकाशला संपल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली.

WhatsApp channel