मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्राचा पुन्हा 'सर्वोच्च' सन्मान! सिंधुदुर्गाचा सुपुत्र होणार सरन्यायाधीश

महाराष्ट्राचा पुन्हा 'सर्वोच्च' सन्मान! सिंधुदुर्गाचा सुपुत्र होणार सरन्यायाधीश

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 29, 2022 12:55 PM IST

जवळपास १४ राज्य सरकारांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात त्यांनी प्रकरणे चालवली आहेत. २०१४ पासून उदय लळीत हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.

न्यायमूर्ती उदय लळीत
न्यायमूर्ती उदय लळीत (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश एन व्ही रमणा (NV Ramana) हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस निवृत्त होतील. त्यांच्यानंतर या पदावर महाराष्ट्रातील सिंधुदूर्गच्या सुपुत्राची वर्णी लागणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती असलेले उदय उदय लळीत (Uday Lalit) हे भारताचे ४९ वे सरन्यायाधीश असणार आहेत. २७ ऑगस्टला ते सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. सिंधुदूर्गमधील देवगड तालुक्यातल्या गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. घरात लहानपणापासूनच वकिलीचे बाळकडू मिळालेले उदय लळीत यांनी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा खटला चालवला होता.

१९८३ मध्ये उदय लळीत यांनी त्यांच्या वकिलीला सुरुवात केली तेव्हा काही वर्षे दिवंगत ज्येष्ठ वकील एम ए राणे यांच्याकडे वकिली केली. पुढे दिल्लीला त्यांनी सहा वर्षे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केलं. तसचं गेल्या काही वर्षांपासून ते सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत आहेत.

सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक हायप्रोफाइल प्रकरणे हाताळली आहे. मात्र तरीही प्रसिद्धीपासून दूर राहिले. २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने अभियोग चालवण्यासाठी विशेष अधिकार वापरून ज्येष्ठ वकील उदय लळीत यांची विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नियुक्ती केली होती.

२००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उदय लळीत यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले. ७ वर्षे ते महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात पॅनलवरील ज्येष्ठ वकीलसुद्धा होते. जवळपास १४ राज्य सरकारांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात त्यांनी प्रकरणे चालवली आहेत. २०१४ पासून उदय लळीत हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत आहेत. येत्या २७ ऑगस्टला भारताचे सरन्यायाधीश म्हणून ते पदभार स्वीकारतील.

उदय लळीत यांच्या कुटुंबात आजोबा, त्यांचे चार काका आणि वडीलसुद्दा वकिली करत होते. त्यांच्या आजोबांनी वकिलीसाठी सोलापूर इथं स्थलांतर केलं होतं. तर त्यांची आजी ही तेव्हाच्या काळात भारतात डॉक्टर झालेल्या मोजक्या महिल्यांपैकी एक एलसीपीएस डॉक्टर होत्या. उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेसुद्धा वकील होते. तसंच १९७४ ते ७६ या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.

IPL_Entry_Point