Raging Case In Nagpur : महाविद्यालयातील सिनियर्स विद्यार्थ्यांकडून ज्यूनियर विद्यार्थ्याला मारहाण करत रॅगिंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं नागपुरात खळबळ उडाली आहे. पीडित विद्यार्थी हा मेडिकल महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत असून त्याच्यासोबत रॅगिंग केल्याची घटना समोर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर आता मेडिकल कॉलेज प्रशासन आणि पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील मेडिकल कॉलेजमधील काही सिनियर्स विद्यार्थ्यांनी किरकोळ कारणावरून एका ज्यूनियर विद्यार्थ्याला मारहाण करत रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं या प्रकाराची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनानं रॅगिंग करणाऱ्या सहा आरोपींची इंटर्नशिप रद्द केली असून त्यांचा वसतीगृहातील प्रवेश रद्द केला आहे. याशिवाय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तातडीनं अँटी रॅगिंग कमिटीची स्थापना करत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
रॅगिंग करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर आता पीडित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी आणि महाविद्यालय प्रशासनानं सहा आरोपी विद्यार्थ्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळं आता आरोपींवर कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच नागपुरातील एका महाविद्यालयात रॅगिंगचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा याच प्रकारची घटना घडल्यानं आता ज्यूनियर्स विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.