राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी होईल अशा बातम्या दाखवून न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत एका मराठी वेबसाइटचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पत्रकार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. जनतेच्या हितासाठी निःस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज कुणी दाबत असेल तर आम्ही त्याच्या मागे भक्कमपणे उभं राहू असं पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार म्हणाले, ‘एका महिलेवर झालेल्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली तसंच मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाच्या जमिनी बळकावणे, कोविडच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे अशी अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आणली. ते माण खटाव येथील पत्रकार तुषार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. सरकारची मनमानी खपवून न घेता अशा प्रकारे जनतेच्या हितासाठी निःस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज कुणी दाबत असेल तर त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणे उभं राहू. सर्व मिडियाही त्यांच्या पाठीशी राहील, ही अपेक्षा!’ अशा शब्दात आमदार रोहित पावर यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय
पुढे आलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने आदेश देऊन देखील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या एकतर्फी बातम्या दाखवून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुषार खरात यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. तुषार खरात यांच्यावर वडूज, दहिवडी, म्हसवड, तळबीड, सोलापूर येथील पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये ॲट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, बदनामी करणे या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे.
संबंधित बातम्या