Journalist Sanjay Kandharkar Accident In Nanded : कोकणातील रिफायनरीला विरोध करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नांदेडमध्ये अवैध मुरुमची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत आणखी एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नांदेडमधील कंधार तालुक्यातल्या पत्रकार संजय कंधारकर यांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला असून त्यानंतर आता या अपघाताची चौकशी करण्याची मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे. शशिकांत वारिसे यांच्या अपघाताचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एका पत्रकाराचा अपघातात मृत्यू झाल्यामुळं नांदेडसह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार संजय कंधारकर हे काही कामानिमित्त लोहा शहरातून कंधारच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी अवैध मुरुमची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरनं त्यांना धडक दिली. त्यानंतर आरोपी डंपरचालकानं घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला. अपघात झाल्याचं कुणाच्याही लक्षात न आल्यामुळं संजय कंधारकर हे तासभर जखमी अवस्थेत घटनास्थळीच पडून होते. त्यानंतर घटनास्थळावरून जाणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांची ओळख पटली. त्यानंतर स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी कंधारकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळं आता या घटनेमुळं नांदेडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीच्या राजापुरमध्ये पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातही पत्रकार संजय कंधारकर यांना अवैध मुरुमची वाहतूक करणाऱ्या डंपरनं धडक दिल्यानं त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता राज्यात पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याशिवाय संजय कंधारकर यांचा अपघात आहे की घातपात, याची चौकशी करण्याचीही मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं केली आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.