Ganesh Visarjan 2023 Pune City : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गणपती विसर्जनाची जोरदार तयारी सुरू आहे. पोलिसांनी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. गणेश मंडळं आणि भाविकांमध्ये विसर्जनासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी अनेक लोकांनी लाडक्या बाप्पाचा अखेरचा निरोप घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता पुण्यात बाप्पांसमोर डान्स करण्यासाठी नोकरीची जाहिरात एका वृत्तपत्रात देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गणरायासमोर डान्स करण्यासाठी तरुणाईला एका दिवसाच्या नोकरीची संधी देण्यात आली असून त्यासाठी मानधनही देण्यात येणार आहे.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचण्यासाठी मुलं हवीत, अशी जाहिरात एका मराठी वृत्तपत्रात देण्यात आली आहे. 'पुणेरी स्पिक्स' या एक्स हँडलवरून व्हायरल जाहिरात शेयर करण्यात आली असून त्यात आयोजकांचा नंबर देखील देण्यात आला आहे. गणपती विसर्जन सोहळ्यात डान्स करण्यासाठी १८ ते ३० वयोगटातील माणसं हवी, त्यांना प्रतिदिवस ३०० रुपये देण्यात येतील, असं व्हायरल जाहिरातीत सांगण्यात आलं आहे.
गणपतीची विसर्जन मिरवणूक २७ सप्टेंबरला निघणार असून त्यावेळी डान्स करणाऱ्यांना प्रतिव्यक्ती ३०० रुपये देण्यात येणार असल्याने त्यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी व्हायरल पोस्ट शेयर करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
गणेश मंडळाच्या आयोजकांनी कोणत्या वृत्तपत्रात जाहिरात दिलीय, याची माहिती समजू शकलेली नाही. परंतु त्यात मोबाईल नंबर देण्यात आलेला असल्याने अनेकांना त्यावर फोन करण्यास सुरुवात केली आहे. 'खाण्यापिण्याची काही सोय आहे का?, घशाला कोरड पडली तर काय करायचं? आणि नोकरीसाठी ऑडिशन द्यावं लागणार का?', असे अनेक प्रश्न लोकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. व्हायरल जाहिरातीत देण्यात आलेली नोकरी ही केवळ एका दिवसापुरतीच असून त्यासाठी लोकांना विसर्जनाच्याच दिवशी बोलावण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या