Jitendra Awhad : मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच..
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jitendra Awhad : मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच..

Jitendra Awhad : मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच..

May 29, 2024 06:40 PM IST

Jitendra Awhad On Manusmriti : मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध करत आव्हाड यांनी महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. यावेळी आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याचे समोर आले आहे. यावरून अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी' ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यावरून राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाला टोकाचा विरोध केला आहे. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध करत आव्हाड यांनी महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. परंतु यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याचे समोर आले आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला असून आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीआहे.

आव्हाडांनी महाड येथेच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागितली पाहिजे, असे न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार अमोल मिटकरींनी दिला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या कृत्याविरोधात ठाण्याच अजित पवार गटानं आंदोलन केले. आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. याबाबत आनंद परांजपे म्हणाले की, महाड येथील चवदार तळ्याजवळ जे कृत्य जितेंद्र आव्हाडांनी केले. ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार, नौटंकीकार आणि नकलाकार जितेंद्र आव्हाड आहेत. डॉ. आंबेडकरांचा फोटो असलेले पोस्टर त्यांनी फाडले आहे. त्यांच्याविरोधात तसेच अन्य आंदोलकांविरोधात महाड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पाहिजे.

स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये. आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी. आव्हाडांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत दिला आहे.

चूक लक्षात येताच जितेंद्र आव्हाडांकडून माफीनामा -

आपली चूक लक्षात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे. भावनेच्या भरात मनुस्मृतीविरुद्ध आंदोलन करत असताना मनुस्मृती हा शब्द लिहिला होता म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यावर बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षात राहिलं नाही. यावर विरोधक राजकारण करत आहेत.

 

मनुस्मृतीविरुद्ध आंदोलन करू नये म्हणूनही राजकारण केलं गेलं. माझ्या चुकीबद्दल मी अत्यंत लीन होऊन माफी मागतो. मनुस्मृती या शब्दाच्या रागापोटी ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यात कुठेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटो आहे म्हणून फाडलं असं नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Whats_app_banner