मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नथुराम गोडसे महाराष्ट्राला लागलेला कलंक, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार - जितेंद्र आव्हाड

नथुराम गोडसे महाराष्ट्राला लागलेला कलंक, अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार - जितेंद्र आव्हाड

Jan 29, 2024 07:10 PM IST

Jitendra Awhad on Ranjit Savarkar : रणजीत सावरकर यांनी पुस्तकातून दावा केला आहे की, गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीने झाली नाही. यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे की, नथुराम देशातील पहिला अतिरेकी होता.

Jitendra awhad replied Ranjit Savarkar
Jitendra awhad replied Ranjit Savarkar

नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झाली नाही, असा दावा रणजीत सावरकर यांनी केला. गांधी हत्येचा तपास नीट झाला नाही. यामुळे याचा फायदा नेहरू घराण्याला झाला. फॉरेन्सिक तपासाच्या आधारे आपण असं वक्तव्य करत असल्याचे सावरकर यांनी म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आणि काळा डाग आहे. तो डाग आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही मंडळी आता पुढे येत आहेत. हे दुर्दैव सल्याचे आव्हाड म्हणाले.

रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचे आज दिल्लीत प्रकाशन करण्यात आले. यावरून वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसेच्या पिस्तुलाने झाडलेल्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झाली नाही. या तपास नीट झाला नाही त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरु कुटुंबाला झाला, असा दावा करत, फॉरेन्सिक पुराव्याद्वारे आपण हे विधान करतोय असे सावरकरांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आव्हाड म्हणाले की, नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी होता. त्यामुळे असल्या लेखकांवर न बोललेले बरे. अशांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे. अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकांवर काय बोलणार? महात्मा गांधी यांचा खून नथुराम गोडसेने केला हे संपूर्ण देशाला माहिती आहे.  नेहरू-गांधींना बदनाम करण्याचा कट अनेक वर्ष सुरू आहे. वाद निर्माण करून राज्यसभेला काय होईल का हे पाहायचे काम सुरू आहे. गोडसेने गांधींना मारले नाही असले सांगितले जात आहे. मग मारणारी एखादी अदृश्य शक्ती असेल. काही दिवसांनी म्हणतील महात्मा गांधी तेथे नव्हतेच. 

महात्मा गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसे याने केलीच नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर या पुस्तकात जे काही लिहिलय, त्याकडे पाहिल्यास पुस्तक लिहिणाऱ्या रणजित सावरकर मानसिक संतुलन ढळले आहे, हेच स्पष्ट दिसून येत आहे. खून झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते; खुनाचा योग्य तपास झाला अन् योग्य सुनावणी झाली. त्यानंतर नथुरामला फाशीची शिक्षा सुनावून त्याला फासावर चढवण्यात आले. नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आणि काळा डाग आहे. तो डाग आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही मंडळी आता पुढे येत आहेत. दुर्देवं हेच आहे की, हे पुस्तक मराठी माणसानेच लिहिलेले आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर