मलंगगड मुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अनेक वर्षे जिथे हिंदू- मुस्लीम सामंजस्याने रहात आहेत. त्या सामंजस्याला नख लागू नये, अशी आपली इच्छा असेल,असे मला वाटते. पण, जे केले जातेय, ते समजण्यापलिकडे आहे, अशी प्रतिक्रिया देत याचा व्हिडिओ आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
ठाणे आणि पालघरच्या सीमेवर असलेल्या मलंगगड येथे अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे. या सप्ताहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (२ जानेवारी) हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मलंगगडाला मुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे. शिंदे म्हणाले की, मलंगगडावर येऊन शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन सुरू केलं. मग आपण जय मलंग, श्री मलंग म्हणू लागलो. त्याचाही आपल्याला आनंद आहे. मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगतो,काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही,परंतु, तुमच्या सर्वांच्या मलंगगड मुक्तीच्या भावना आहेत,मला त्या भावनांची कल्पना आहे आणि त्या पूर्ण केल्याशिवायहा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही.
मलंगगडावर दोन्ही धर्माचे लोक या जागेवर दावा करतात. काही वर्षांपूर्वी शिवसेना नेते आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. शिवसेना आणि स्थानिक हिंदू संघटनांचं हे आंदोलन अजूनही चालू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.त्यात आव्हाड यांनी म्हटले की,मुख्यमंत्री साहेब,आपण आपल्या भाषणात काय उद्देशाने बोलता;आपण मनात काय ठेवून भाष्य करता,आपल्या वक्तव्यांमध्ये स्पष्टता नाही. अनेक वर्षे जिथे हिंदू- मुस्लीम सामंजस्याने रहात आहेत. त्या सामंजस्याला नख लागू नये,अशी आपली इच्छा असेल,असे मला वाटते. पण, जे केले जातेय, ते समजण्यापलिकडे आहे. मुख्यमंत्रीसाहेब आपण आता फक्त एकनाथ शिंदे नाहीत तर आता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात. दोन्ही समाजात शांतता,सामंजस्य भंग आणि धर्माधर्मात तेढ निर्माण होऊन आपल्या हातून वातावरण बिघडेल,असे कृत्य घडू नये;हे अर्थात,आपला तसा स्वभावही नाही. पण,आपण असे का वागतात, हे कळत नाही.