मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jitendra Awhad : आमच्या पक्षानं 'तुतारी' हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं 'तुतारी' हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 23, 2024 11:11 AM IST

Jitendra Awhad News : ‘निवडणूक आयोगाकडं आम्ही तीन वेगळी चिन्हं सुचवली होती, पण त्यांनी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह दिलं, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

NCP Sharadchandra Pawar Election Symbol
NCP Sharadchandra Pawar Election Symbol

NCP Sharadchandra Pawar Party Symbol : ‘आमच्या पक्षानं ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाकडं मागितलंच नव्हतं. आम्ही इतर तीन चिन्हं सुचवली होती, पण आयोगानं स्वत:हूनच हे चिन्ह दिलं,’ असा दावा पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी मूळ पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगानं तो दावा मान्य करून पक्षासह 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. त्यामुळं शरद पवार गटासमोर निवडणुकीसाठी चिन्हाचा प्रश्न उभा राहिला होता.

निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नवं नाव दिल्यानंतर चिन्हासाठीही अर्ज मागवला होता. त्यानुसार शरद पवार गटानं तीन पर्याय दिले होते. गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या पक्षाला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह दिलं. सोशल मीडियावर हे चिन्ह व्हायरलही झालं आहे. पवारांच्या पक्षानं या चिन्हाचं स्वागतही केलं. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळं पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर आज एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘निवडणूक आयोगाकडं आम्ही जी तीन चिन्हं सुचविली होती, त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी आम्हाला 'तुतारी' हे चिन्ह दिलं,' असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हा तर शुभसंकेत

निवडणूक आयोगानं दिलेलं हे चिन्ह म्हणजे आमच्यासाठी शुभसंकेत आहेत. एक प्रकारे आयोगानं आम्हाला लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत 'तुम्ही युद्धाला उभे राहा आणि जिंका' असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना 'तुतारी' हे चिन्ह देऊन दिला आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point