मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BDD: घरांसाठी पोलिसांना ५० लाख भरावे लागणार; आव्हाडांच्या घोषणेमुळं सेनेची गोची

BDD: घरांसाठी पोलिसांना ५० लाख भरावे लागणार; आव्हाडांच्या घोषणेमुळं सेनेची गोची

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 20, 2022 03:10 PM IST

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वरळीतल्या बीडीडी चाळीत राहाणाऱ्या दोन हजारपेक्षा जास्त पोलिसांच्या कुटुंबांना नवी घरं हवी असतील तर पन्नास लाख भरावे लागतील असं म्हटलंय,मात्र आव्हाडांच्या या निर्णयानं पोलिसांसोबतच शिवसेनेचीही झोप उडाली आहे.

बीडीडी चाळ
बीडीडी चाळ (हिंदुस्तान टाइम्स)

नायगाव, वरळी, ना.म.जोशी आणि शिवडी एकूण ५० इमारती असून त्यात जवळपास २ हजारांच्या वर पोलीस कर्मचारी आपल्या परिवारासह राहातात. या इमारतींच्या पुनर्विकासाचा सोहळा काही महिन्यांपूर्वी थाटात पार पडला होता. आतातर नायगाब बीडीडी चाळीतल्या १७ आणि १८ क्रमांकाच्या इमारती रिकाम्या करुन तिथल्या परिवारांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं.त्यााधी कितव्या मजल्यावर जागा मिळेल यासाठी १३७  रहिवाशांची लॉटरी काढण्यात आली. मग या परिसरात दिवाळी साजरी करण्यात आली. एकमेकांचं तोंड गोड करण्यात आलं. त्यानंतर मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जागा हवी असेल तर दीड कोटी किमतीच्या जागेसाठी किमान ५० लाख रुपये भरावे लागतील अशी घोषणा केल्यावर क्षणार्धात त्या आनंदावर विरजण पडलंय. वर्षानुवर्ष ज्या पोलीस दलाची इमाने इतबारे सेवा केली, आयुष्य पोलीस सेवेत काढलं त्यापोटी पैसे मिळाले ते जेमतेम ३० लाख रुपये. आता हे ५० लाख रुपये भरायचे कसे असा प्रश्न या पोलिसांच्या कुटुंबियांसमोर उभा राहिला आहे.

'न्यायालयीन लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही'   

आता मात्र आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागेल असं इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. शासकीय निवासस्थानं कर्मचाऱ्यांच्या नावे करण्याच्या शासनाच्या १९९४ च्या आदेशानंतर आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. बांधकाम खर्च म्हणून १५ ते २० लाख रुपये देण्यास कोणाचीही हरकत नाही मात्र ५० लाख आमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असल्याचं इथले कर्मचारी सांगतात

आव्हाडांची घोषणा, शिवसेनेची अडचण

 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या घोषणेमुळे आता शिवसेनेची मात्र चांगलीच अडचण ठरणार आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे हा मतदारसंघ विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त बीडीडी चाळी येत असल्याने आता सेनेची पंचाईत झाल्याचं पाहायला मिळतंय. या पोलीस कर्मचाऱ्यांची नाराजी ओढवून घणं म्हणजे हजारो मतांवर त्याचा थेट परिणाम होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता शिवसेना यावर काही मध्यमार्ग काढायच्या तयारीत असेल हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.

IPL_Entry_Point